मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा कायम असताना ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नेते नाराज असल्याचं दिसत आहे.
महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केले असल्याचे सूर निघत आहे. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेने युती धर्म पाळला पाहिजे आणि फेरविचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेची घोषणा केली त्याबद्दल आमच्या सर्वांची नाराजी आहे. युती आघाडीचा धर्म पाळला पाहिजे यावर त्यांनी विचार केला पाहिजे होता, आता पुन्हा फेरविचार केला पाहिजे. भिवंडी, सांगली या पारंपारिक आमच्या जागा आहेत. मुंबईत एक जागा दिलेली आहे. आणखी एक जागा द्यावी आमची अपेक्षा आहे. मात्र, तसं न करता त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यांनी काळजी घेणे आवश्यक होतं. ती त्यांनी घेतली नाही.
या जागांवरती आम्ही आणि आमचे कार्यकर्ते अजूनही ठाम आहेत. दिल्लीतील आमचे नेतेही यावर आग्रही आहेत. सांगलीची जागा ही वसंतदादा पाटील यांच्यापासून राहिलेली आहे. या जागा सोडणे आम्हाला खूप वेदनादायी आहेत, त्यामुळे याचा फेरविचार झाला पाहिजे. सांगली, भिवंडी आणि मध्य मुंबई यासाठी अजूनही आम्ही आग्रही आहे आणि प्रयत्न करत आहोत त्यांनी फेरविचार करावा. असं बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली.