मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. देशातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात इंडिया आघाडीनेही कंबर कसली आहे. पण, राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने लोकसभेच्या 23 जागांवर दावा ठोकला आहे, पण काँग्रेस नेत्यांकडून हा दावा फेटाळला आहे. त्याशिवाय काँग्रेसने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे, ही जागा कोणत्या परिस्थितीत सोडणार नसल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितले आहे.
मुंबई उत्तर मतदारसंघात सध्या भाजपचा खासदार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी विजय मिळवला होता. काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला होता. गोपाळ शेट्टी यांना 706678 इतकी मते मिळाली होती. तर उर्मिला मातोंडकर यांना 241431 मतांवर समाधान मानावे लागले होते. आता हा मतदार संघ कुणाकडे जाणार? याची चर्चा आहे.
दरम्यान संजय राऊत 23 जागांची लिस्ट घेऊन आमच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर एवढ्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल माजी खासदार संजय निरुपम यांनी उपस्थित केला. वंचित बहुजन आघाडीनेही बारा जागांचे प्रपोजल दिलं आहे, अशी बातमी मीडियामध्ये पाहिली. एवढ्या जागा ते घेणार असतील तर बाकीच्यांना काय करावे? हा माझा प्रश्न आहे? इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात, मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या, असेही संजय निरुपम म्हणाले.
काँग्रेसकडून शिवसेना उद्धव ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीसाठीचा २३ जागांचा प्रस्ताव नाकारला. पण दुसरीकडे शिवसेना मात्र आपल्या जांगावर ठाम आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आम्ही 23 जागांवर ठाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीत राज्यातील 48 पैकी 23 जागांवर ठाम आहोत. मागील आणि त्याच्या मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या किती विजयी जागा होत्या ? मागच्या लोकसभा निवडणुकीत फक्त काँग्रेस एका जागेवर विजयी झालं. आणि ती जागा बाळू धानोरकर यांची होती, ती जागासुद्धा शिवसेनेची होती. आता त्यावरूनच तुम्ही समजून घ्या !! तुम्हाला किती जागा हव्यात? असं सावंत म्हणाले.