मुंबई : राज्यात सद्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून बँकेच्या खात्यात ३००० रुपये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी महिलांना देण्यात आला. परंतु काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आला खरा पण कर्ज थकीत असल्यामुळे बँकेकडून त्यांचे पैसे कपात करण्यात येत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. अशामध्ये आता सरकारकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे कपात करू नका, असे निर्देश सरकारकडून बँकांना देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये, अशा सूचना महिला व बालविकास विभागाकडून बँकांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना यावेळी देण्यात आले आहेत.