मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजपने मोठे पक्ष फोडण्याची रणनिती आखली आहे. महाविकास आघाडीतील बडे नेते फोडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यापुढे एक मोठा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करुन काँग्रेससह एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते.
नांदेड येथील क्रॉंग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या हाताची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी आजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रमेश चेन्नीथला, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम या प्रमुख नेत्यांनी चव्हाण यांची भेट घेतली होती. या वेळी चेन्नीथला यांनी शरद पवार यांच्यासमोर त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे शरद पवार गटाने तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हे नाव स्वीकारले आहे. त्यामुळे आता हा गट कायम ठेवायचा की काँग्रेसमध्ये जायचे, हा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर आहे.
दरम्यान, पुण्यातील शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी सध्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.