मुंबई : शिंदे गटात सुरुवातीपासून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे आणि फायर नेते म्हणून परिचित असणारे महाडचे आमदार भरत गोगावले यांची अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २० सप्टेंबर रोजी शासनाने याबाबतचे परिपत्रक काढत एसटी महामंडळाला सूचित केले आहे. यामुळे एसटी महामंडळाला स्वतंत्र अध्यक्ष मिळणार आहे. राज्यात विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना महामंडळाचे वाटप केले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत टप्याटप्प्याने महामंडळाचे वाटप सुरू असून, आमदार सदा सरवणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी खासदार आनंदराव अडसुळ तब्बल १० वर्षांनंतर आणि आमदार संजय शिरसाट यांची आतापर्यंत महामंडळपदी वर्णी लागली आहे. त्याचवेळी शुक्रवार २० सप्टेंबर रोजी गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीमुळे परिवहन विभाग गोगावलेंची नियुक्ती करण्यात आली असली तरी महामंडाळाच्या अध्यक्षपदासाठी असलेल्या १९५२च्या नियमांत बदल करावा लागणार आहे.