मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरुन होणाऱ्या टीका टिपण्णीवर आज थेटपणे भाष्य केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, अशी सगळ्यांचीच भूमिका असूनही काही लोक वेगळी विधानं करत आहेत. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली.. अशी विधानं करणं चुकीचं आहे. मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं. परंतु जेव्हा मराठ्यांना देण्याची वेळ आली तेव्हा असं बोलू नये. हे सरकार सगळ्यांचं आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम कुणीही करु नये, ते चुकीचं आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या कुणबी नोंदीसंदर्भातील अधिसूचनेवरुन नाराजी व्यक्त केली होती. नारायण राणे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर भुजबळांच्या निवासस्थानी सायंकाळी ५ वाजता ओबीसी नेत्यांची बैठक झाली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रतापगडावरील गडकोट मोहिमेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. मागच्या ३९ वर्षांपासून रायरेश्वर ते प्रतापगड अशी पायी दौड तरुण करत असतात, तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.. असे यावेळी शिंदे म्हणाले.
कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे आणि ओबीसींसह इतर समाज घटकांवर अन्याय न होऊ देणारे आरक्षण सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. राज्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडू लागलेल्या आहेत, त्यासंदर्भात नोटिफिकेशनदेखील काढण्यात आले आहे. आरक्षणाची स्पष्टता येण्यासाठी कालच नोटिफिकेशन काढण्यात आले असून समाजाला न्याय मिळावा, अशी सरकारची भूमिका आहे.