मुंबई : २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रामललाच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा नवा रेकॉर्ड बनला. पहिल्याच दिवशीच मंदिरात ५ लाख भविकांनी दर्शन घेतले. त्यातच, महाराष्ट्र सरकारचं अख्ख मंत्रिमंडळही लवकरच रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे. विशेष म्हणजे अख्ख मंत्रिमंडळ एकसाथ रामललाच्या दर्शनाला जाणार आहे.
दर्शनासाठी गेलेले भाविक किरकोळ जखमी
रामललाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली. यादरम्यान काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनीही रामललच्या दर्शनासाठी थोडं थांबून या, असे आवाहन देशाताली रामभक्तांना केले आहे.
५ फेब्रुवारी ही तारीख जवळपास निश्चित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५ फेब्रुवारी ही तारीख जवळपास निश्चित झाल्याचे समजत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री अख्ख मंत्रिमंडळ घेऊन रामललाचे दर्शन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरू शकते. दरम्यान, २२ जानेवारी २०२३ रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही महाराष्ट्रातच होते. त्यामुळे, आता १० ते १२ दिवसांनी मुख्यमंत्री शिंदे हे उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाणार आहेत.