मुंबई: राज्यात शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली असून या अंतर्गत विविध विभागांमार्फत आतापर्यंत ४११ कामांसंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली ३७२ कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ८५ टक्के कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. सर्व विभागांनी येत्या १ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, तसेच प्रत्येक विभागाने शंभर दिवस कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे शंभर दिवस कृती कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागांचे मंत्री, संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.