मुंबई: शिवसेना (Shivsena) प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. सध्या या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार अशी घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दादर परिसरात होते. त्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार सदा सरवणकर, नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे हे दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यास गेले होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे हे स्मृतीस्थळावरून निघून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आणि खासदार अनिल देसाई तिथे दाखल झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
महिलांना धक्काबुक्की, शिदे गटाचा आरोप
उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे देखील म्हात्रे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे गटाने आरोप फेटाळले
एकनाथ शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल देसाई यांनी म्हटले. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या स्थानाचे पावित्र्य भंग करायचे नाही, असेही त्यांनी म्हटले.