आहिल्यानगर : राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके या पाण्यात वाहून गेली आहेत. अशातच राज्यातील शेतकरी हतबल होऊन सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहे.

दुसरीकडे राज्य सरकार नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम करत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन 5 रुपये असा निधी द्यावा अशी घोषणा केली होती. मात्र, विरोधकांनी सरकार शेतकऱ्यांच्या खिशातूनच पैसे काढून शेतकऱ्यांनाच मदत देणार असल्याचा आरोप केला.

तसेच काही साखर कारखान्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. दरम्यान, याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, साखर कारखान्यांना मोठा इशारा दिला आहे. ते आज आहिल्यानगरमधील लोणी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, “काही दिवसापूर्वी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली, तेव्हा आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की, तीस-तीस हजार कोटींचे व्यवहार होत आहेत. सरकार तुम्हाला दहा-दहा हजार कोटी देत आहे, तर मग तुमच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी 5 रुपये बाजूला काढून ठेवा. आम्ही ते पैसे एफआरपीमधून मागितले नव्हते. एफआरपीमधील पैसे शेतकऱ्यांचे आहेत आणि नफ्यातील पैसे हे कारखान्यांचे आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “आपण विचार केला तर जवळपास 200 कारखाने आहेत. त्यामध्ये प्रत्येक एका कारखान्याला आपण 25 लाख रुपये शेतकऱ्यांना वेगळे काढून ठेवायला सांगितलं, तर काही लोकांनी मोठ्या प्रमाणात गजब उभा केला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे वसूल करता? शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांच्या नफ्यातून मागितले होते. जो शेतकरी तुमच्याकडे शेतमाल टाकतो, शेतकरी शेतात राबतो, त्या शेतकऱ्यांवर आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितलं तर तुम्ही मागेपुढे पाहता?”
पुढे त्यांनी शेतकऱ्यांच्या मालात काटा मारणाऱ्या कारखान्यांना देखील इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘मी असे काही कारखाने शोधून काढले आहेत, जे शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात काटा मारतात. काटा मारून मारून तुम्ही पैसे जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपये मागितले तर तुमची ते देण्याची दानत नाही. तुम्ही या कारखान्यांचे मालक नाहीत, आमचा शेतकरी या कारखान्यांचा मालक आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचे काम सरकार करेल, त्या कारखान्यांना मी आता दाखवतो.” असं म्हणत फडणवीस यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या वजनात फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांवर आगामी काळात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







