मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. काल (दि. ३) महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. सत्ता वाटपाच्या तिढ्यामुळे जवळपास दोन आठवड्यांनी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यापूर्वी गृह खात्याच्या मागणीवरून विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच बोललं जात होतं. गृह खाते आणि अर्थ खात्यांवरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार ओढाताणी सुरू आहे. या दोन्ही खात्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपली भूमिका मांडली आहे.
विरोधकांशी संवाद मी तो पुन्हा सुरू करेन…
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मुद्यांना स्पर्श केला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसोबत संवाद साधण्याच्या मुद्यावर त्यांनी म्हटले की, आम्हाला जनतेनं बहुमत दिलंय, एक स्थिर सरकार जनतेला हवं आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पहिल्यापासून राहिली. 2019 पासून 2024 पर्यंत या संवादात अडथळा आला. महाराष्ट्रात दक्षिणेसारखी रक्ताला चटावल्यासारखं राजकारण नाही. पण 2019 पर्यंत जो संवाद होता तो राहिला नाही. मी तो पुन्हा सुरू करेन. आमच्या विरोधी पक्षाची संख्या किती यावरून त्यांना ओळखणार नाही. तर लोकशाहीतलं त्यांचं महत्त्व ओळखून त्यांच्याशी व्यवहार करू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गृह आणि अर्थ खाते कोणाकडे?
एकनाथ शिंदे यांनी गृह आणि अर्थ खात्याची मागणी केली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपद नसल्याने आपल्या पक्षाला गृह मंत्री अथवा अर्थ खाते द्यावे अशी मागणी भाजपकडे करण्यात आल्याचे बोललं जात आहे. महायुतीमधील सत्ता वाटपाच्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पक्षाला सगळी खाती आपल्याकडे असावीत असं वाटतं. पण महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसूनच हे सगळं ठरवतील. गृह खात्याबद्दल चर्चा होती पण त्यावर तणाव नसून काही खाती असतात ज्यावर चर्चा होत असते. तिन्ही पक्षांना न्याय मिळाला हे दाखवणं गरजेचं असतं. गृह आणि अर्थ खात्याबद्दल चर्चा सुरू आहे, अंतिम निर्णय होईल तेव्हा नक्की सांगेन, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.