मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवन येथे दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी आहेत. तर, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या कोअर समितीची बैठक ‘सागर’ बंगल्यावर सुरू आहे.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या न्या. शिंदे यांच्या समितीने सरकारला आपला पहिला अहवाल सादर केला आहे. या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली असली तरी प्राथमिक निष्कर्षाच्या आधारे सरकारकडून मराठा समुदायाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण आंदोलन आता अधिक पेटू लागले आहे. जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपोषण सुरू आहे. तर, बीडसह काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. सत्ताधारी आमदार, नेते आंदोलकांच्या निशाण्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.