मुंबई : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदे गटाने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच टर्मपासून यवतमाळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तिकीट कापल्यानंतर आता भावना गवळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांनी ‘एबीपी माझा’शी सवांद साधला, मी यवतमाळ-वाशिम मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नसून मी आता माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असं भावना गवळी यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यामुळे आता भावना गवळी या महायुतीच्या अधिकृत उमदेवार राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करुन अर्ज भरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी याचं तिकीट कापल जाणार असी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सूरू होती. त्यामुळे भावना गवळी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची देखील त्यांनी भेट घेतली होती.
मात्र या भेटीगाठीनंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच तिकीटं कापलं असून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भावना गवळी यवतमाळ-वाशिम मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.