मालवण : नौदल दिनानिमित्त राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी मुसळधार पाऊस व वादळी वा-यामुळे कोसळला. या घटनेमुळे राज्य सरकार अडचणीत आले असून विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.
राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदलाच्या वतीने उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं कंत्राट हे मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. याचे प्रोप्रायटर आणि शिल्पकार जयदीप आपटे आहेत तर स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांनी काम पाहिले होते. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे जयदीप आपटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे राज्य सरकार अडचणीत आले असून विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर जयदीप आपटे नावाचा तरुण चर्चेत आला आहे. ज्याने या पुतळ्याची उभारणी केली. 4 डिसेंबर 2023 रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे याची एक विशेष मुलाखत सनातन प्रभात या दैनिकात छापून आली होती. ज्यामध्ये त्याने पुतळा उभारणीविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
कोण आहे जयदीप आपटे?
जयदीप आपटे हा 25 वर्षाचा तरूण असून कल्याण येथील रहिवाशी आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा 35 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. इतका मोठा पुतळा बनवण्यासाठी साधारणत: 3 वर्षांचा कालावधी लागतो, असे तज्ज्ञाचे मत आहे. परंतु, हा पुतळा अवघ्या सात महिन्यात पूर्ण करण्यात आला. म्हणजेच गेल्या वर्षी जून महिन्यात हा पुतळा बनवण्यास सुरुवात झाली. तर, डिसेंबर 2023 पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण झाले, अशी माहिती जयदीप आपटे यांनी स्वत: मुलाखती बोलताना सांगितले.
‘त्या’ मुलाखतीत जयदीप आपटे नेमकं काय म्हणाले?
त्याने या मुलाखतीत म्हटले होते की, या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला. शिवरायांचा पुतळा साकारणं ही आपल्यासाठी मोठी संधी आहे, सगळं व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल, असे वाटले.. पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे.. संधी हातातून सोडायची नाही.’
‘कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय, या कामाच्या आधी 3 – 4 शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करताना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती ‘एखादा पुतळा तयार करणार का?’, अशी. भारतीय नौदल काम करून घेणार.’
‘त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार; म्हणून मग मीच ठरवले की, काम करायचे. एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे 3 लहान नमुने (मॉडेल) बनवले. त्यातील 2 नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले, असे जयदीप आपटेने मुलाखतीत बोलताना सांगितले होते.