मुंबई: शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या विरोधात छगन भुजबळांना उतरवणार होते. परंतु, भुजबळ याणी शिरुरमधून लढण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतरच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ म्हणाले की, नाशिक लोकसभेसाठी माझे नाव अंतिम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढता का? अशी विचारणा केली होती. शिरूर मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे.
जर मी शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवली तर नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली असती, असा त्यामागे उद्देश होता. मात्र, मी नाशिक लोकसभा सोडून जायचा प्रश्नच येत नसल्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.
दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली होती. यानंतर ओबीसी समाज नाराज असल्या चर्चा आहे. याबाबत छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, मला नाशिकमधून उमेदवारी नाही म्हणून कोणी नाराज आहे, असे अजिबात नाही. लोक त्यांच्या भावना आहेत त्या व्यक्त करत असतात. आता सगळ्या गोष्टी आता मागे गेल्या आहेत, असंही भुजबळ म्हणाले.