कल्याण : कल्याण येथील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीकडून लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल पाटील असं अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीच्या विरोधात या आधी देखील नाशिकमध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील एका इमारतीमध्ये तरुणी राहत आहे. या तरुणीची आणि कुणाल पाटील याची मॅट्रोमोनीयल एपवर ओळख झाली होती. कुणालने या तरुणीशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने वेगवेगळे कारणे देत तिच्याकडे पैशाची मागणी केली. या तरुणीने विश्वास ठेवून सुरुवातीला पैसे दिले. त्यानंतर पुन्हा आरोपीने वेगवेगळे कारणं देत पैसे मागितले. यावेळी तरुणीने पैसे नाहीत असे सांगत नकार दिला. तरी देखील आरोपी कुणालने पैशांसाठी तगादा लावला. या तरुणीने पुन्हा क्रेडिट कार्ड तसेच बँकेचं लोन काढून पैसे दिले, वर्षभरात तब्बल 60 लाख रुपये कुणालने तरुणीकडून उकळले.
दरम्यान, तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता कुणालने टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.