मुंबई : वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून रविवारी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून रविवारी सायंकाळी करीर यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला. मुख्य सचिव मनोज सौनिक रविवार, ३१ डिसेंबर २०२३ रोजी निवृत्त झाले आहेत. राज्य सरकारने सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केंद्राला केली होती. मात्र, त्यावर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही. सौनिक यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून 30 एप्रिल ते 31 डिसेंबर या कार्यकाळात जबाबदारी सांभाळली.
१९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले करीर ३१ मार्च २०२४ रोजी निवृत्त होत असले तरी सार्वत्रिक लोकसभा व त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता करीर यांना मुदतवाढ मिळून ऑक्टोबर २०२४ पर्यंत म्हणजे पुढील १० महिने मुख्य सचिवपदावर राहण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केंद्राला केली होती मात्र, केंद्राने राज्याचा प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे करीर आणि सुजाता सौनिक यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. वरिष्ठता लक्षात घेता गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची वर्णी लागणार होती. मात्र, सौनिक जून २०२५ मध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांना करीर यांच्यानंतर संधी देता येईल, हे लक्षात घेऊन महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या करीर यांना मुख्य सचिवपदाची संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
डॉ. नितीन करीर यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळली
अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. नितीन करीर यांची एक प्रामाणिक व कार्यतत्पर सनदी अधिकारी म्हणून ओळख राहिली आहे. डॉ. करीर यांनी एमबीबीएस पदवी घेतली. त्यांची १९८८ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या करीर यांनी महसूल, वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पुढे सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिकेचे आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही काम केले आहे.