मुंबई : इसिस मॉडयुल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सहा मुख्य आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयात चारशे पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. इसिसचा देशाविरोधी हिंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न आरोपी करत होते, असा दावा एनआयएने(NIA) केला आहे.( ISIS module case)
तसेच देशात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी इसिसने रचलेल्या कट- कारस्थानांचा गौप्यस्फोट एनआयएने आरोपपत्रात केला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या विदेशी हस्तकांशी असलेले आरोपींचे कनेक्शन यावर आरोपपत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे.
विशेष सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयात एनआयएने दाखल केलेल्या ४०० पानांच्या आरोपपत्रात १६ साक्षीदार आहेत. जागतिक पातळीवर दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय असलेली संघटना इसिसमध्ये भरती तसेच या संघटनेला पैसा पुरवण्यासाठी सहा आरोपींनी सहभाग घेतल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.
झुल्फिकार अली बडोदावाला व आकीफ अतीक नाच्चन या दोघांविरुद्ध यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आयईडी बनवल्याबद्दल पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ताबिश आणि झुल्फिकार या दोन आरोपींनी इसिसच्या स्वयंभू खलिफाशी शपथ घेतली होती, असाही खुलासा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.
जुलै महिन्यामध्ये विविध भागातून एनआयएने अटक केलेल्या ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लालाभाई, शॉल शेख, बोरिवली-पडघा येथील आकीफ अतीक नाचन, जुबेर नूर मोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसैवा आणि पुण्यातील डॉ. अदनानली सरकार या सहा आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती एनआयएकडून मिळत आहे.