मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवून नवीन चेहऱ्यांना संधी द्या, अशी मागणी काँग्रेसमधूनच जोर धरू लागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि विश्वजीत कदम यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. १५ किंवा १६ जानेवारीला काँग्रेस पक्षाकडून अधिकृत नावाची घोषणा होईल, असं काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष बनले होते. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला चार वर्षे झाली आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले असले तरी विधानसबेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. झालेल्या पराभवामुळे पटोले यांना हटविण्याची मागणी पक्षातून केली जात आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांचा शोध सुरू आहे. पक्षात पुन्हा उत्साह निर्माण करेल, असे नेतृत्व काँग्रेसला हवे आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यासह वरिष्ठ नेत्याच्या नावांवर फुली मारली गेल्याची माहिती मिळत आहे. यशोमती ठाकूर यांचे नाव विदर्भातून पुढे आले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या जागा जिंकल्या आहेत त्यात निम्म्याहून अधिक विदर्भातील आहेत. लोकसभेत काँग्रेसला विदर्भात चांगले यश मिळाले. त्यामुळे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचे नाव विधिमंडळ गटनेतेपदासाठी चर्चेत आहेत. पटोले यांनी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे पटोले वा वडेट्टीवार यांच्यापैकी कुणालाही विधिमंडळ गटनेते बनविले तर प्रदेशाध्यक्षपद मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जावू शकते.