मुंबई : विधानपरिषद निवडणुक होताच भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवणारे वृत्त समोर आले आहे. भाजपचे खासदार भाजपचे नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केली आहे. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप विनायक राऊत यांनी याचिकेतून केला आहे. नारायण राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला असून 47858 मतांनी विजय मिळवला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीत नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून तसेच पैसे वाटून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेतून केला आहे.
नारायण राणेंनी मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या,अशी मागणी राऊत यांनी याचिकेतून केली आहे. आता हायकोर्ट यासंदर्भात नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तसेच नारायण राणे त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले आहेत. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई झाली नाही, म्हणून ही याचिका दाखल करण्यात आल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
काय आहे विनायक राऊत यांचा आरोप?
निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करत होते. नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाले आहेत.
नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही, अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख विनायक राऊत यांनी याचिकेत केला आहे.