मुंबई: एसी लोकल आणि नॉनएसी लोकलमध्ये गेल्या काही दिवसांपासून विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढत आहे. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींनंतर मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी अशा घटनांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाइन पुन्हा सुरू केली आहे. यासाठी मध्य रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक ७२०८८१९९८७ सुरू केला असून, यापुढील काळात प्रवाशांना या क्रमांकावर आपली तक्रार करता येणार असून, तत्काळ मध्य रेल्वेद्वारे याची दखल घेत कारवाई केली जाणार आहे.
मध्य रेल्वेवर प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. याच गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून येत आहेत. एसी लोकलमध्येही प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. याचा त्रास नियमाने पास, तिकीट घेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. याबाबत प्रवाशांकडून मध्य रेल्वेकडे तक्रारी करण्यात येत आहेत. याची दखल घेत मध्य रेल्वेने व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला असून, प्रवाशांना यावर तक्रार करता येणार आहे. अलीकडेच गर्दीच्या वेळी नॉनएसी लोकल आणि एसी लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लासमध्ये दोन दिवसांच्या विशेष तपासणीत तिकीटविरहित प्रवासाची १ हजारहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.