मुंबई : अवकाळी पावासाचा मुंबई लोकल सेवेला मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका मागोमाग एक लोकल थांबल्या आहेत. यामुळे हजारो प्रवासी अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवून दिली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. हा पाऊस सोबत वादळी वारा घेऊन आला आहे.
मुंबईत अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडली होती. मात्र तब्बल 45 मिनिटानंतर वाहतूक सुरू झाली. ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यानं घरी परतणा-या मुंबईकरांचा खोळंबा झाला. वाहतूक ठप्प झाल्यानं 45 मिनिटं डाऊन मार्गावरील लोकल एकाच ठिकाणी उभ्या होत्या. हजारो रेल्वे प्रवाशी लोकलमध्ये अडकून पडले. अखेर 45 मिनिटांनी हळूहळू मध्य रेल्वे पूर्वपदावर येत आहे. मात्र, लोकल उशीरा धावत आहेत.
सोमवारी सकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळूत झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. दुपारी 12 च्या सुमारास बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरु करण्यात आलीये. मात्र ही लोकल फे-या अर्धा ते पाऊणतास उशिरानं धावत होत्या. त्यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदारांचे मोठे हाल झाले होते. यानंतर दुपारी दिवसभरात दुसऱ्यांदा मध्य रेल्वे विस्कळीत झाली.
मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. प्रचंड वादळी वाऱ्यामुळे ओव्हर हेड वायरचा खांब कोसळला आहे. यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. विशेष म्हणजे वादळी वारे आणि पावसामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरही मोठा परिणाम पडला आहे. अंबरनाथ स्थानकाजवळ झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर पडल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली.