उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील शांतीनगर स्मशानभूमीत रविवारी अक्षय शिंदे याच्या दफनविधीदरम्यान मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. दफन झालेल्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रविवारी अक्षय शिंदे याच्या दफनविधीला स्थानिक नागरिक आणि काही राजकीय नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. या विरोधामुळे शांतता भंग होण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनाने अत्यंत तत्परतेने स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. शांतीनगर स्मशानभमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यामागे उद्देश हा आहे की, परिसरातील हालचालींवर सतत नजर ठेवता येईल आणि कोणत्याही अनुचित घटनेला प्रतिबंध घालता येईल. या सीसीटीव्ही यंत्रणेच्या सहाय्याने दफनभूमी स्थळाच्या आसपासच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आटोक्यात ठेवता येणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच प्रशासनाने या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या उपस्थितीमुळे तणावग्रस्त वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अक्षय शिंदे याच्या दफनविधीला झालेल्या विरोधामुळे हा मुद्दा संवेदनशील बनला आहे. विरोधकांचा आरोप आहे की, उल्हासनगर शहरातील नागरिकांवर हा निर्णय जबरदस्तीने लादला गेला आहे.