मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना देखील सीबीआयकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास आता बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
दरम्यान आपल्या मालकीचा भूखंड बळकावण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी व्यावसायिक शरद अग्रवाल यांनी माजी आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात धमकावणे आणि खंडणीप्रकरणी जुलै 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पुनमिया आणि जैन यांना अटक देखील झाली होती. मात्र, सिंग यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली नव्हती.
24 मार्च 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सिंग यांच्या विरोधातील पाचही एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देत त्यांना अटकेपासून संरक्षण देखील दिले होते. या प्रकरणी सीबीआयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करुन तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे.