Maharashtra Cyber Cell : एका यूट्यूब चॅनलने बाल लैंगिक शोषण सामग्री अपलोड केला आहे. यामध्ये मुलगा आणि त्याच्या आईचा समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने या चॅनलवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात सदर चॅनलच्या भारतातील प्रतिनिधिचेही नाव आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोग द्वारे सायबर पोलीस अधिक्षकांना आठ जानेवारी रोजी एक पत्र देण्यात आलं होतं. यामध्ये हा युट्युब चॅनल आणि त्यावरील सामग्री आणि झालेली कारवाई याबाबत विचारणा करण्यात आली होती.
दरम्यान, आयोगाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे की, यूट्यूब चॅनलवर एक विचित्र ट्रेंड सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्ये दिलेल्या “चॅलेंज” मध्ये लोक सहभागी होतात. खास करुन यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांचा सहभाग जास्त आहे. ही मुलं आणि महिला अश्लिल स्वरुपाची सामग्री उपलब्ध करुन देतात. ही सामग्री युट्युब चॅनेलवर अपलोड केली जाते.
NCPCR ने दिलेल्या माहितीत युट्युब चॅनेलचे नाव ‘XXXX Vlogs’ असून त्यावरुन अश्लिल सामग्री प्रसारित केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेल विभागाने केलेल्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, हे युट्युब चॅनेल मुंबईजवळील पालघर जिल्ह्यातील एका ठिकाणाहून चालवले जात होते.
चाइल्ड पोर्नोग्राफीच्या संदर्भात महाराष्ट्र सायबर सेलने यूट्यूब चॅनल आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने महाराष्ट्र सायबरला चाइल्ड पोर्नोग्राफीवर कंटेंट असलेल्या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती दिली होती. भारतीय दंड संहिता तंत्रत्रान कायदा आणि POCSO च्या कलम 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.