मुंबई: भोंदू अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat) मनी लॉन्डरिंग तपासादरम्यान नवे धक्कादायक आरोप समोर आले आहेत. ईडीने अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले. या सुनावणीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार, बँक व्यवहार आणि बेनामी खात्यांबाबत गंभीर मुद्दे मांडण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणात अशोक खरातला 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)
मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ईडीने न्यायालयाकडे 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीच्या मते, तक्रारदारांकडून पूजा-अर्चा आणि धार्मिक विधींच्या नावाखाली तब्बल 5 कोटी 62 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, अशोक खरातने स्वतःला ‘देवाचा अवतार’ असल्याचे भासवून काही लोकांकडून पैसे घेतल्याचा संशय आहे.
तपासादरम्यान अनेक बँक खात्यांमधून रक्कम खरातच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर झाल्याचे समोर आल्याचा दावा ईडीने केला. यातील काही पैसे अमेरिकेतील उपचारासाठी वापरण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही व्यक्तींकडून 50 लाख, 80 लाख आणि एका व्यक्तीकडून तब्बल 3 कोटी 80 लाख रुपये घेतल्याचे ईडीने न्यायालयात नमूद केले.
याशिवाय समता पतसंस्थेत 60 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने बँक खाती उघडण्यात आल्याचा आरोपही ईडीने केला आहे. तपासात या सर्व खात्यांशी जोडलेला मोबाईल नंबर अशोक खरातचा असल्याचा दावा करण्यात आला. तसेच अनेक खात्यांमध्ये त्याचे नाव नॉमिनी म्हणून असल्याचेही समोर आले आहे.
ईडीच्या मते, या खात्यांमधून 23 कोटी 80 लाख रुपये रोख स्वरूपात काढण्यात आले असून या पैशांचा वापर नेमका कुठे झाला, याचा तपास सुरू आहे. याशिवाय 34 बेनामी एफडी खात्यांचाही तपास सुरू असून केवायसी प्रक्रियेत अनियमितता असल्याचे कोर्टात सांगण्यात आले.
दरम्यान, न्यायालयात अशोक खरातने या सर्व आरोपांबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. संबंधित खात्यांमध्ये स्वतःचे नाव नॉमिनी किंवा मोबाईल नंबर लिंक का आहे, याची माहिती नसल्याचे त्याने सांगितले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ईडीकडून सुरू आहे.







