पनवेल : मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या शिरढोण गावाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ माजली होती. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सुशांत कुमार कृष्णा दास (वय- ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुशांतचा गळा चिरुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अमित रामक्षय राय (२० वर्ष) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दोनशे रुपयांसाठी हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा शिरढोण गावातील धनाजी महाडिक यांच्या चाळीत राहत होता. अमित आणि सुशांत एकाच हॉटेलमध्ये काम करत होते. अवघ्या दोनशे रुपयांच्या वादातून हत्या झाल्याचे अमितने पोलीसांना दिलेल्या जबाबात कबूल केले आहे. सुशांत शिरढोण येथील साईप्रसाद हॉटेलमध्ये स्वयंपाकघराचा मुख्य पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. घटनेनंतर सुशांत काम करत असलेल्या हॉटेलमध्ये त्याचे सहकारी कर्मचारी व इतरांची चौकशी पोलीसांनी सुरू केली.
दरम्यान, सुशांतचा गळा चिरुन त्याची हत्या केल्याने परिसरात नेमके सुशांतचे वैरी कोण याबाबत चर्चा सुरू होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर स्थानिक पोलीसांसह नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग क्रमांक २ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उमेश गवळी यांचे पोलीस पथक हत्या करणाऱ्यांच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी सुशांत ज्या हॉटेलमध्ये काम करत होता, त्याच हॉटेलमधील सुशांतचा सहकारी अमितला ताब्यात घेतले. अमितची चौकशी केली असता, सूशांतच्या हत्येची कबुली त्याने दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.