मुंबई : राज्यात गुन्हेंगारींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता ठाण्यातील कोलशेत येथे एका इमारतीवर सुपरवायझरने आईवरुन शिवीगाळ केल्याने आरोपीने क्राइम वेब सिरिज पाहून एकाची हत्या करून त्याचे मुंडके छतावर ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आता ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने इमारतीतील सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.
सोमनाथ सदगिरे (वय 35) असे हत्या झालेल्या सिक्युरिटी सुपरवायजरचे नाव आहे. तर प्रसाद कदम असे आरोपी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलशेत येथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या छतावर सफाई कर्मचारी गेले होते. यावेळी त्यांना सिक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ सदगिरे यांचा मृतदेह व धडापासून वेगळे केले मुंडके आढळून आले होते. त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर व पाठीवर गंभीर वार करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाच पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यावेळी इमारतीतील सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हा सोमनाथ यांच्यासोबत जात असल्याचे आढळून आले होते. तर परतताना कदम एकटाच होता. त्यामुळे हत्या त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अखेर कदम याचा शोध घेऊन त्याला अटक केली. दरम्यान, प्रसाद कदम याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याच तपासात पुढं आलं आहे.