उरण : रायगड जिल्ह्यातील उरण येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीचा चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह आढळला आहे. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचे नाव आहे. उरण येथील एनआय स्कूलजवळ तिचा मृतदेह आढळला असून तिच्या छातीवर आणि अंगावर गंभीर जखमा आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शनिवारी सकाळच्या सुमारास उरण-पनवेल मार्गावरील रस्त्यालगत यशश्रीचा मृतदेह आढळून आला. प्रेमसंबंधातून तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यशश्रीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी उरण येथील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान, आरोपीचा शोध पोलिस घेत असून तो बंगलोर येथे पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी हा अल्पसंख्यांक समाजातील असल्याने उरण येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.