मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधील भूज परिसरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश मिळाले.
सलमानच्या घराबाहेर रविवारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी आरोपींची नावे आहेत. पुढील चौकशीसाठी या दोघांना मुंबईमध्ये आणण्यात आले आहे. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स विश्नोईशी संबंधित लोकांची नावेही समोर आलीत.
सलमान खानशी संबंधित आणखी एका माहितीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी शूटर्सनी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटची पाहणी केली होती. अनमोलने फेसबुक पोस्ट टाकण्यासाठी व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापरल्याचा पोलिसांना संशय आहे.
याआधीही गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात विशाल उर्फ कालूचे नावही चर्चेत आले होते. कालू हा हरियाणातील गुरुग्रामचा रहिवासी आहे.
रोहतक पोलिसांच्या वॉन्टेड यादीत त्याचा समावेश आहे.कालू हा लॉरेन्स टोळीचा शूटर असून हरियाणातील रोहतक येथे एका भंगार व्यापाऱ्याच्या हत्येनंतर त्याचे नाव चर्चेत आले होते. राजस्थानच्या जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्सने सलमानला माफी मागावी अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे.
मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा (Crime Branch) या प्रकरणाचा तपास करत आहे. सोमवारी पीटीआय या वृत्तसंस्थेने सीसीटीव्ही फुटेजमधून घेतलेले छायाचित्र प्रसिद्ध केले. फोटोमध्ये आरोपी टोपी घातलेला आणि खांद्यावर बॅग घेऊन जाताना दिसत आहे. गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यापूर्वी वांद्रे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय दंड संहिता (IPC) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत ‘अज्ञात व्यक्ती’ विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रविवारी गोळीबार होण्यापूर्वी सलमानला मिळालेल्या धमक्या पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलून सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.