मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर 2024 ला मतदान पार पडलं होतं. विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 28 उमेदवारांनी अर्ज केला होता. तरीही ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात या निवडणुकीत थेट लढत झाली.
दरम्यान, सध्या मतमोजणी सुरु असून या निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. आतापर्यंत पाच जागांचे निकाल समोर आले आहेत. या पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या बहीण निशा सावरा यांचा दारुण पराभव झाला आहे. निशा सावरा यांचे वडील हे विष्णू सावरा हे माजी आदिवासी मंत्री आहेत.
या निवडणुकीतील पाच आरक्षित जागांचा निकाल आतापर्यंत समोर आला आहे. या पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. महिला प्रवर्ग म्हणून आरक्षित असलेल्या जागेवर युवासेनेच्या उमेदवार स्नेहा गवळी विरुद्ध अभाविपच्या रेणूका ठाकूर या निवडणुकीच्या मैदानात होत्या. त्यांचा तब्बल 5914 एवढ्या दणदणीत मतांनी विजय झाला आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणूका ठाकूर यांना केवळ 893 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
हे आहेत विजयी उमेदवार
तर SC प्रवर्गातून युवासेनेकडून शीतल शेठ देवरुखकर, तर अभाविपकडून राजेंद्र सायगावकर यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली. पण या जागेवरही युवासेनेने विजय मिळवला आहे. युवासेनेच्या शीतल शेठ देवरुखकर यांना तब्बल 5489 मतांनी विजय मिळवला आहे. तर अभाविपचे राजेंद्र सायगावकर यांना केवळ 1014 मतांवर समाधान मानावं लागलं.
OBC प्रवर्गातून युवासेनेकडून मयूर पांचाळ, तर अभाविपकडून राकेश भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर होईल असं वाटत असताना युवासेनेचे मयूर पांचाळ यांनी 5350 मते मिळवत विजय मिळवला. तर राकेश भुजबळ यांना केवळ 888 मते मिळाली आहेत.
ST प्रवर्गातून धनराज कोहचडे हे युवासेनेचे उमेदवार होते. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निशा सावरा या उमेदवार होत्या. निशा सावरा यांचे वडील विष्णू सावरा हे माजी आदिवासी मंत्री आहेत. तसेच त्यांचे भाऊ हेमंत सावरा हे पालघरचे विद्यमान भाजप खासदार आहेत. पण तरीही भाजपची ताकद या निवडणुकीत कमी पडली आहे. युवासेनेचे उमेदवार धनराज कोहचडे यांना 5247 मते मिळाली, तर अभाविपच्या निशा सावरा यांना केवळ 924 मतांवर समाधान मानावं लागलं.
NT प्रवर्गातून युवासेनेकडून शशिकांत झोरे उमेदवार होते. तर अभाविपकडून अजिंक्य जाधव उमेदवार होते. या जागेवरही युनासेनेचे उमेदवार शशिकांत झोरे विजयी झाले. त्यांना 5170 मते मिळाली, तर अजिंक्य जाधव यांना केवळ 1066 जागांवर समाधान मानावं लागलं.