मुंबई: शरद पवार गटातील 10 आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात अजित पवार गटाने मंगळवारी हायकोर्टात धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि मंत्री अनिल पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी शरद पवार गटातील 10 आमदारांना अपात्र न करण्याच्या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देत आमदार जयंत पाटील आणि आमदार अनिल देशमुख यांच्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर बुधवारी मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली.
हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत राज्य विधिमंडळ सचिवालयासह अन्य सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. ज्यात 11 मार्चपर्यंत प्रतिज्ञपत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत याचिकेवरील पुढील सुनावणी 14 मार्च रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.