मुंबई: शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरीता 6 आठवडे स्थगितीची एनआयएने मागणी केली. मात्र, उच्च न्यायालयाने ही मागणी अंशतः मान्य करत अंमलबजावणीसाठी तीन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांच्या जामीनाचा आदेश दिला.
शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप एनआयएने केला आहे. या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत, असं निरीक्षण या आधी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं नोंदवून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नवलखा यांना नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
गौतम नवलखा यांनी नियमित जामीनासाठी केलेला अर्ज विशेष एनआयए कोर्टानं नामंजूर केल्यानंतर त्याला नवलखा यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. यावर पुन्हा सुनावणी घेत तातडीनं निकाल देण्याचे आदेश हायकोर्टानं एनआयए कोर्टाला दिले होते. त्यानुसार एनआयए कोर्टानं यावर नव्यानं सुनावणी घेत नवलखा यांचा जामीन पुन्हा फेटाळून लावला होता.