मुंबई: मुस्लिम समाजातील पुरुषाला एकापेक्षा जास्त विवाह करून विवाहांची नोंदणी करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. बी. पी. कुलाबावाला आणि न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने एकापेक्षा जास्त विवाहांना परवानगी देणाऱ्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यांनुसार, मुस्लिम पुरुषाला हा अधिकार असल्याचे स्पष्ट करत विवाह नोंदणीवर निर्णय येण्याचे निर्देश न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले आहेत.
एका मुस्लिम व्यक्तीने अल्जेरियातील एका महिलेबरोबर विवाह केला. त्याचा हा तिसरा विवाह असल्याने या विवाहाची नोंदणी करून घेण्यास ठाणे पालिकेने नकार दिल्याने मुस्लिम व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्याने मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचा दावा केला. तर ठाणे पालिकेने महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ मॅरेज ब्यूरोज आणि मॅरेज अॅक्टच्या तरतुदीनुसार सदर नोंदणी बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता.