मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन येत आहेत. आता मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. याबाबत एएनआयने एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे.
“मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशामुळे मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे मुंबई पोलिसांनी म्हटले असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह देशभरातील विविध शहरांत बॉम्ब हल्ले होण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. तसेच, विमान, मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्याही धमक्या मिळाल्या होत्या. परंतु, चौकशीअंती हे फोन बोगस असल्याचे स्पष्ट झाले होते. अनेकदा धमकी देणारा गंमत म्हणून धमकीचा संदेश पाठवत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आज आलेल्या संदेशाचीही चौकशी सुरू आहे.