मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा मालदीवला चांगलाच नुकसानीचा ठरला आहे. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेल्यानंतर मालदीवच्या पर्यटनात चांगलीच घट झाली आहे. अनेक मोदी समर्थक भारतीयांनी आपला मालदीव दौरा रद्द केला आहे. त्याचा फटका तिथल्या हॉटेल व्यावसायीकांना बसला आहे. सोशल मीडियावर बायकॉट लक्षद्वीप ट्रेंड सुरु झाला आहे.
लक्षद्वीपच्या समुद्रातले मोदींचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीयांनी आपला मालदीव दौरा रद्द केला आहे. आतापर्यंत 8000 जणांनी हॉटेल बुकींग रद्द केले आहे. 2300 फ्लाइट तिकीट रद्द करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे ही संख्या वाढतच आहे. याशिवाय अख्ये बॉलीवूड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आले आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी मालदीव ऐवजी लक्षदीपच्या पर्यटनाला जाण्याचे आवाहन केले आहे.
नेमका काय प्रकार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्याची चांगलीच चर्चा झाली. मालद्वीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर भारतीय उच्चायुक्तांकडून मालद्वीव सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. मालद्वीवनेही मोदींविरोधात टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांना निलंबित केले. परंतु भारतीयांनी सोशल मीडियावर मोहीम सुरु केली. यामध्ये बॉलीवूड कलाकार अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर आणि जॉन अब्राहमसह अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले.
बॉलीवूडचा पाठिंबा
जॉन अब्राहमने ट्वीट करत लिहिले, अद्भुत भारतीय आतिथ्य, “अतिथि देवो भव:”हे विचार आहे. लक्षद्वीप पर्यंटनासाठी सर्वात चांगली जागा आहे. सलमान खानने मोहिमेचे समर्थन करत लिहिले, लक्षद्वीपवरील सुंदर, स्वच्छ समुद्र किनारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून खूप आनंद झाला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा सर्व आमचा द्वीप आहे.
अक्षयकुमार याने म्हटले…
अक्षय कुमार याने म्हटले की मालद्वीवकडून भारतीय समुदायाविरोधात आक्षेपार्ह टीका केली गेली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मला धक्का बसला आहे आणि आश्चर्यही वाटले. आम्ही शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवतो. परंतु आपल्याला विनाकारण द्वेष सहन करावा लागत आहे. मी अनेक वेळा मालदीवला भेट दिली आहे. नेहमीच त्यांचे कौतुक केले आहे. परंतू आता सन्मान प्रथम आहे. चला #IndianIslands एक्सप्लोर करण्याचा आणि स्वतःच्या पर्यटनाला पाठिंबा देण्याचे ठरवू या.