कसारा: मुंबईहून नाशिककडे जात असताना एका अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे कार महामार्गालगतच्या नाल्यात जाऊन एका दरडीला धडकल्याने झालेल्या अपघातात राजश्री प्रशांत गायकवाड (४५) यांचा मृत्यू झाला. मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत गायकवाड यांच्या त्या पत्नी होत्या.
राजश्री गायकवाड आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या इनोव्हा कारने नाशिककडे जात होत्या. या दरम्यान, कसारा बायपासजवळील साईबाबा खिंड येथील तीव्र उतारादरम्यान त्यांच्या इनोव्हा कारला अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करतेवेळी कट मारली. यामुळे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व इनोव्हा कार नाल्यात जाऊन एका महाकाय दरडीवर आदळली. या वेळी राजश्री गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मनोज शिलेदार यांचा पाय अडकून पडल्याने त्यांनाही दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, महामार्ग पोलीस शहापूर, कसारा पोलीस, टोल रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले.
अपघातात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या राजश्री प्रशांत गायकवाड यांना रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले; परंतु अति रक्तस्त्राव व डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पायाला गंभीर दुखापत झाल्याने मनोज शिलेदार यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. तर कारचालक सुखरुप आहे. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित पुढील तपास करीत आहेत.