मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील महाचर्चेनंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मंत्रिमंडळातील नावे आणि खातेवाटप यांना मंजुरी मिळवली आहे. एकनाथ शिंदे राजी झाल्यास शनिवारी फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकतो. मात्र, गृह आणि अर्थ खातेही भाजपकडे ठेवून फडणवीस मित्रपक्षांना अनपेक्षित धक्का देऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप २०, शिवसेना १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १० मंत्री अशा एकूण ४० मंत्र्यांची नावे आणि खाती निश्चित करण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित असलेले अर्थखाते भाजप स्वतः कडे ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवार यांना धक्का बसू शकतो. गृहखात्यासाठी आग्रही असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यावर समाधान मानावे लागेल, अशी शक्यता आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही दोन्ही महत्त्वाची खाती असण्याची शक्यता आहे.