मुंबई : नव्या महायुती सरकारमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री असेल हे अजित पवार, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले असले, तरी मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर निकालाला दहा दिवस झाले तरी मिळालेले नाही. भाजपने आपला विधिमंडळ पक्षनेता अद्याप निवडलेला नाही ना नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली.
रविवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांशी झूमद्वारे ऑनलाइन बैठक संवाद साधला. आमदारांनासुद्धा मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, विधिमंडळ बैठक होईल हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. सुरुवातीला १ डिसेंबरला बैठक होईल असे सांगण्यात आले, नंतर २ डिसेंबरला होईल, अशी माहिती देण्यात आली. परंतु, अधिकृतरीत्या बैठकीची वेळ आणि तारीख जाहीर केलेली नाही.
भाजप पक्षनेतृत्त्वाने अद्याप पक्षनिरीक्षकांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आता मंगळवारी किंवा थेट बुधवारी म्हणजे शपथविधीच्या आदल्या दिवशी होईल, असे सांगण्यात आले आहे.