मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवरअसताना विविध पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग देखील सुरु आहे. आता भारतीय जनता पक्षाचा विद्यमान खासदार ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. जळगावचे खासदार उन्मेश पाटील हे शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी थेट मुंबईत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आले आहे.
जळगावमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. उन्मेश पाटील यांनी संजय राऊतांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याने खासदार उन्मेष पाटील हे नाराज आहेत. त्यामुळेच ते पत्नीसोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे.
भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार असलेल्या उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळेउन्मेश पाटील नाराज आहेत. त्यामुळे नाराज उन्मेश पाटील पत्नीसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उन्मेश पाटील यांच्या पत्नीला ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
भाजप खासदार उन्मेश पाटील नाराज असून पत्नी संपदा यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच आता उन्मेश पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. दरम्यान उन्मेश पाटील यांच्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, पाटील हे आमच्या पक्षात प्रवेश करणार का नाही ते माहित नाही, परंतु त्यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. आता या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, हे येत्या काही दिवसांत समोर येणार आहे.