मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मोठ मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करुन आश्वासने देत आहेत. अशातच मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तसेच यावेळी, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार ? यावर अमित शहा यांनी मोठ भाष्य केलं आहे.
महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर अमित शाह बोलताना म्हणाले, सध्या महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले. महायुतीचे सरकार आल्यावर तीन पक्षांची कमेटी बनणार आहे. ती कमेटी तिन्ही पक्षाचा संकल्पपत्राचा अभ्यास करुन ती लागू करण्याबाबत निर्णय घेणार आहे.
मुख्यमंत्री कधी ठरणार याचे उत्तर देताना अमित शहा यांनी राजकीय वर्तुळात होत असलेल्या चर्चांवरुन खोचक प्रतिक्रीया दिली आहे. युतीचा मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरवू पण आम्ही शरद पवारांना कोणतीच संधी देणार नाही, असे म्हणत अमित शहा यांनी शरद पवार यांचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष का फुटला ते अमित शाह यांनी सांगितले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षापेक्षा परिवारास प्राधान्य दिले, यामुळे पक्ष फुटला. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे ऐवजी अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली असती आणि उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे ऐवजी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष दिला असता तर हे दोन्ही पक्ष फुटले नसते. त्यांना कधीतरी परिवार बाजूला ठेऊन पक्षाला प्राधान्य द्यावा लागणार आहे, असेही बोलताना अमित शाह म्हटले.