मुंबई : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अशातच बोरीवली विधानसभेतील भाजपामधील पेच अखेर सुटला आहे. माजी खासदार आणि भाजपाचे नेते गोपाळ शेट्टी यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं आहे.
यावेळी बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, माझं म्हणणं पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचलं आहे. बोरीवली मतदारसंघात केले जाणारे प्रयोग आणि त्याबद्दलची नाराजी मी पक्ष श्रेष्ठींकडे मांडली आहे. मी अन्य पक्षात जाणार नाही, हे मी सांगितले होते. माझी लढाई एका विशिष्ट कार्यपद्धतीविरोधात आहे. भाजप पक्ष कार्यकर्त्यांची खूप काळजी घेतो. मला आनंद आहे की, माझ्या पक्षातील नेत्यांनी संवाद साधला. त्यामुळे मी आता माघार घेतो. माझा मुद्दा पक्षश्रेष्ठींकडे पोहोचला आहे. सातत्याने बोरिवलीत अन्याय होतो, अशी चर्चा होती.
बोरीवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांच्या जागी भाजपाकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने ते नाराज झाले होते. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत अर्ज दाखल केला होता. गोपाळ शेट्टी दोन टर्म खासदार राहिले आहेत. त्यांचा जनसंपर्क देखील बोरीवली परिसरात दांडगा असल्याने भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता होती. या कारणामुळे गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु होते. अखेर निवडणुकीतून भाजपाचे नेते गोपाळ शेट्टी यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले.