मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरच दावा केला. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेत, सडेतोड प्रत्युत्तर दिले. नारायण राणे यांना तिकीट मिळणे अवघड होते. शिवसेनेने माघार घेऊन प्रामाणिकपणे मदत केल्याने ते निवडून आले. त्यामुळे राणेंनी सांभाळून बोलावे, अशा शब्दांत शिवसेनेने ठणकावले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत नारायण राणे विजयी झाले. शिवसेनेच्या (ठाकरे) विनायक राऊतांचा थोड्या फरकाने त्यांनी पराभव केला. रत्नागिरीचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी निवडणुकीत मदत केली नाही. राणे अशा लोकांना माफ करत नाही, असा सूचक इशारा भाजपच्या नितेश राणे यांनी दिला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक गड आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तो भाजपला मिळावा, असा दावा केला. शिवसेनेने यावर जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे कोकणात भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे.
हा मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपमधून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार ठरवतील. लोकशाहीत कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. निर्णय नेतेमंडळी घेतात. महायुतीमधील एक जबाबदार मंत्री असल्याने यातून वाद वाढवायचा नाही. राणेंच्या मताचा मी आदर करतो, असे म्हणत उदय सामंत यांनी नीलेश राणेंना प्रत्युत्तर दिले. तसेच मी प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, असे देखील सांगितले.