मुंबई: भाजपने राज्यात विधानसभेसाठी १४८ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हा महायुतीत आल्याने भाजपला जागावाटपात अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या, तरी भाजपने महायुतीतील मित्रपक्षांकडून आपले तब्बल १७ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना शिंदे पक्षाला १२, अजित पवारांच्या पक्षाला ४, तर आरपीआय आठवले गटाला १ उमेदवार भाजपने पुरवला आहे. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना महायुतीत भाजपने १६४ जागा लढवल्या होत्या. त्यात यंदा १६ जागांची घट झाली असली, तरी मित्रपक्षांना १७ उमेदवार देऊन भाजपने बेनकेन प्रकारे १६५ नेते विधानसभेच्या रिंगणात असतील याची सोय केल्याचे मानले जाते.
मित्रपक्षांना १७ उमेदवार देताना भाजपने आपल्या मित्रांकडून एकही उमेदवार आयात केरलेला नाही, हे विशेष. यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष महायुतीत सामील झाल्याने जागावाटपांचा मोठा पेच निर्माण होईल, अशी स्थिती होती. पण भाजपने कोणताही वाद होऊ न देता कौशल्याने जागावाटप करण्यात यश मिळवले, राष्ट्रवादीच्या समावेशाने २०१९ मधील १६४ जागांवरून भाजपला दीडशेच्या खाली म्हणजे १४८ जागांवरच समाधान मानाचे लागले. मात्र, शिवसेना पक्षाला १२, अजित पवारांच्या पक्षाला ४, तर आरपीआय आठवलेंच्या पक्षालाही भाजपनेच उमेदवार पुरवला आहे. त्यामुळे एक प्रकारे भाजपचे १६५ उमेदवार विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत.
सोबतच, भाजपने रवी राणा (बडनेरा), रासपचे रत्नाकर गुट्टे (गंगाखेड), जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे (शिरोळ) आदी तीन मित्रपक्षांच्या विद्यमान आमदारांना जागा सोडल्या आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाने ८० जागांवर, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने ५२ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
निलेश राणे (कुडाळ-मालवण), संजना जाधव-दानवे (कन्नड), राजेंद्र गावित (पालघर), विलास तरे (बोईसर), संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व), मुरजी पटेल (अंधेरी पूर्व), शायना एन. सी. (मुंबादेवी), अमोल खताळ (संगमनेर), अजित पिंगळे (धाराशिव), दिग्विजय बागल (करमाळा), विठ्ठल लंघे (नेवासा), बळीराम शिरसकर (बाळापूर) आदी १२ भाजप उमेदवार शिवसेना शिंदे यांच्या पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव), प्रताप पाटील-चिखलीकर (लोहा-कंधार), निशिकांत पाटील (वाळवा-इस्लामपूर) आणि संजयकाका पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ) हे चार जण राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत सिंह हे आरपीआयच्या आठवले गटाकडून कलिना मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत.