मुंबई : पावणे एमआयडीसीतून तुर्भे नाका येथे तरुणांची अचानक दुचाकी स्लिप झाली आहे. यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेला तरुण पाठीमागून येणा-या टॅंकरखाली सापडून जागीच ठार झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी तुर्भे नाका येथील फायझर रोडवर घडली.
या अपघातानंतर टॅंकरचालक फरार झाला आहे. या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव राहुलकुमार राजकुमार रॉय (वय-18) असून तो पावणे एमआयडीसीमध्ये राहत होता.
सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहुलकुमार व त्याचा सहकारी ऋषी कुमार महातो (वय 19) हे दोघे दुचाकीवरुन एमआयडीसीतून तुर्भे नाका येथे जात होते. यावेळी त्यांची दुचाकी फायझर रोडवर मच्छी मार्केटजवळ अचानक स्लिप झाली. त्यावेळी दोघेही खाली पडले. त्या वेळी पाठीमागून भरधाव येणा-या टॅंकरखाली राहुलकुमार सापडल्याने तो जागीच ठार झाला आहे.