मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात समेट घडवून आणण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याची माहिती मिळत आहे. फडणवीसांच्या मध्यस्तीमुळे दोघांमधील वाद अखेर मिटला असून, दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या वाटेतील आडकाठी दूर झाली आहे. नेत्यांमधील वाद जवळपास संपुष्टात आल्याने महायुतीच्या नेत्यांनी हुश्श्य केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येत आहे. विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडणार असल्याचे विजय शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. अजित पवार आणि शरद पवारांवर हल्लाबोल करत बारामतीत पवारांविरोधात उमेदवारी अर्ज भरणारच असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला होता. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात काय होते, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे बारामतीत लोकसभेची तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत असतानाच बुधवारी (ता. २७) पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा केली. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. फडणवीस यांच्या मनधरणीनंतर शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतर्गत मतभेद विसरून कामाला लागा. मिशन ४५ प्लस डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे उमेदवार विजयी होतील, यावर लक्ष केंद्रीत करा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या होता. महायुतीतील संयुक्त पत्रकार परिषदेत नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.