मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे. यानंतर महाविकास आघाडीतले मतभेद समोर येऊ लागले आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाषा मविआच्या नेत्यांकडून केली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही गाफिल राहिलो हे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतले वादही समोर आले. दरम्यान मागच्या महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याचबरोबर सामनातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली होती. दरम्यान आदित्य ठाकरेही दोन, तीन वेळा फडणवीसांना भेटले. यानंतर राज्याच्या राजकारणात काही वेगळी समीकरणं जुळतायत का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी एक उत्तर दिलं आहे. ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे कोणती गणती जुळवली जातायत?
या विधानभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी अत्यंत कठोर भूमिका घेत प्रचार केला होता. एका सभेत तर ते म्हणाले होते, ‘तू तरी राहशील किंवा मी तरी राहिन’ असं म्हणूनआव्हानही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं होतं. या आव्हानाला देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने उत्तर दिलं. ‘राजकारनामध्ये कुणीही संपत नसतं तेही राहतील आणि मी देखील राहिन’ असं ते म्हणाले होते.
राजकारणातून एखाद्याला हटवायचं कि नाही हा निर्णय जनता घेत असते. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गंभीर टीका केल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झालेल्या फडणवीस यांना भेटायला जाणं या बाबीकडे राज्याच्या राजकारणातील महत्वाची घडामोड म्हणून पाहिली जाते आहे. याबाबत अमृता फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तसंच भाजपाचं सरकार आल्यावरच राज्यात जातीय तेढ निर्माण होते का? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे .
राज्यातल्या जातीय राजकारणावर अमृता फडणवीस म्हणाल्या…
“माझ्यामते, देवेंद्र फडणवीस असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळेच विकासाचं राजकारण करत आहेत. जातीय राजकारण आपण लोकं निर्माण करतो, आपण ते नाही केलं पाहिजे. लोकांच्या आणि माध्यमांवर हि बाब अवलंबून आहे” असं अमृता फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.
शिवसेनेची (उ बा ठा) यांची भूमिका बदलतीये का?
शिवसेनेची (उ बा ठा ) राजकीय भूमिका बदलत आहे काय? असं विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, “नेत्यांमध्ये जे काही मतभेद आहेत ते विचारधारांबाबत आहेत. वैयक्तिक पातळीव मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद असल्यामुळे एकेकाळी असलेला शत्रू , मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो. हे राजकारणात चालत राहतं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत.” असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.