मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फूट उंच पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. यावरुन राज्यात एकच संतापाची लाट उसळली होती. राजकीय गोटात तर आरोप प्रत्यारोपही झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आता 16 पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकोट येथील महाराजांचा पुतळा चुकीच्या वेल्डिंग कामामुळे कोसळला. गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असा धक्कादायक खुलासा या अहवालात करण्यात आला आहे.
मालवण दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीने हा अहवाल सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. ३५ फूट उंच असलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची एकच लाट पसरली होती. वेगवेळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत होत्या.
या दुर्घटनेबाबत शिंदे सरकारने चौकशी समिती स्थापन केली होती. भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने हा अहवाल सादर केला आहे. पुतळा कोसळण्यामागील नेमकं कारण काय होतं? याची चौकशी समितीने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही समिती गठीत करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांचा देखील या समितीमध्ये समावेश होता. तसेच आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांचा समावेश सुद्धा या समितीमध्ये होता.