मुंबई : जी.टी. रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. तब्बल 9 लाख 87 हजारहून अधिक रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याची माहिती मिळत आहे. 10 बनावट चेकच्या माध्यमातून वैद्यकीय अधिक्षकांच्या खोट्या सहीवरुन पैसे वळवले असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 च्या दरम्यान रक्कम काढल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जी टी रुग्णालयात गरीबांसाठी चालवल्या जाणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. बनावट चेकच्या माध्यमातून रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांच्या खोट्या स्वाक्षरीकरून हे पैसे सात जणांच्या खात्यावर वळवण्यात आल्याचे प्रथमदर्शी समोर आले आहे. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान ही रक्कम काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. एकाच नंबरचे चेक दोन वेगवेगळ्या खात्यावर वटवण्यात आल्याने ही बाब समोर आली आहे.
गुन्हा दाखल..
मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात 7 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक करण्यात आलेली रक्कम उत्तर प्रदेशमधील निहाल, विनोद यादव, अंजुम तारा, वरून यादव, शशांक कुमार, रोहित राज यांच्यासह अन्य आरोपींच्या खात्यावर जमा झाल्याचे समोर आले आहे.
पैशांवर डल्ला मारल्याने अनेकांना धक्का
सायबर चोरट्यांनी आता तिसऱ्यांदा जी टी रुग्णालयातील गरीबांसाठी चालवल्या जाणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याने अनेकाच्या भूवया उंचावल्या असून या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.