मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मविआमध्ये जागावाटपावरुन काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मिठाचा खडा पडला आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. शनिवारी मातोश्रीवर रमेश चेन्नीथला बैठकीसाठी गेले होते. परंतु, ही बैठक निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. काल मविआची जागावाटपावर दहा तास बैठक झाली होती. परंतु, जागा वाटपाचा तिढा मात्र सुटलेला दिसत नाही. त्यामुळे ठाकरे वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. कारण मात्रोश्रीवर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
काल साधारण दहा तास बैठक झाली, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि त्या बैठकीनंतर आज सकाळी माझं आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेना नेते यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील आणि आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल आणि आज साडेबारा वाजता पक्षप्रमुख यांनी तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. आम्ही सगळे आता मातोश्रीवर जाऊ चर्चा करू आणि फुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू, असे संजय राऊत म्हणाले आहे.
आदित्य ठाकरे पोहचले पवारांच्या भेटीला..
उद्धव ठाकरे यांचा मॅसेज घेऊन आदित्य ठाकरे वाय बी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना झाले आहेत. शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. रात्री झालेल्या मविआच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याची माहिती मिळाली आहे. संजय राऊत बैठक संपण्याआधीच निघून गेले होते. त्यानंतर तातडीने रात्रीच ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांना मातोश्रीवर आज बैठकीसाठी बोलावलं आहे. नाशिक पश्चिम जागेवरून रात्रीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खटके उडल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक पश्चिम जागेवर ठाकरे सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिलेत. तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे.